’वेचित चाललो...’ वर नवीन:      

हासून ते पाहाणे       भविष्यवाणी       वेचताना... : तुझे आहे तुजपाशी       स्थितप्रज्ञस्य का भाषा       लोकशाहीच्या नावानं चांगभलं       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (उत्तरार्ध)       वर्षान्त विशेष: सण आले जुळुनि... (पूर्वार्ध)       स्वातंत्र्यदिनाची वेचणी : देशासाठी चार गीते       द मेड ते पोस्टमेन इन द माऊंटन्स... व्हाया प्रदक्षिणा, राशोमोन, ब्रॉडचर्च       अमरत्वाची आस नि चिरंजीवित्वाचा फास       ’बोर्डचाट्या’च्या शोधात       स्त्री-सबलतेचा जाहीरनामा       तडा       वेचताना... : जैत रे जैत       द्विधा       माशा मासा खाई       पुन्हा लांडगा...       वेचताना... : लांडगा       वेचताना... : लांडगा आला रेऽ आला       वृकमंगल सावधाऽन      

व्हाय गुड गर्ल्स लाईक बॅड गाइज?       बिटविन द डेव्हिल अ‍ॅंड द डीप सी       हनुमान जन्मला गं सखे       तांत्रिक आप्पा       उंदीर-श्रद्धा आणि इलेक्ट्रॉन-श्रद्धा       लेखक याचक आणि राजा वाचक?       मांजराचे काय, माणसाचे काय       प्रकाश नावाची प्रत्येक व्यक्ती वैज्ञानिक असते       शून्य, आकार आणि अनंताची वाटचाल       कुराणाच्या संस्कृत अनुवादाच्या निमित्ताने       माझी ब्लॉगयात्रा : १ . माध्यमे   २. माझी वाटचाल   ३. ब्लॉग लिहिताना   ४. ब्लॉग लिहिल्यानंतर   ५. मजकूर सुरक्षितता   ६. अनुक्रमणिका आणि सूची   ७. मोबाईल-विशेष   ८. केल्याने प्रसिद्धी         अंडे आधी... पण भुर्जी की ऑम्लेट?       ...तर तुमचं लेखन, असतं आम्ही वाचलं       आनंदे न्हाती त्यात तृणांची पाती      

रविवार, ६ सप्टेंबर, २०२०

लेखांक १२: कम्युनिस्टांच्या देशात व्लादिमिरचा अनोखा लढा

'Let us defend our laws from being encroached upon by the authorities' - Vladimir Bukovskii.

साठच्या दशकाच्या सुरुवातीस मॉस्को विद्यापीठात ’कॉस्मोनॉल’ या कम्युनिस्ट पक्षाच्या युवा शाखेवर टीका करणारे टिपण प्रसिद्ध झाले. त्यात ही नैतिक आणि आध्यात्मिक दिशा हरवलेली, मरु घातलेली संघटना असल्याचे म्हटले होते. या संघटनेमध्ये पुन्हा चैतन्य प्रदान करायचे असेल तर त्यात लोकशाही रुजवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केलेले होते. हे टिपण सोव्हिएत गुप्तहेर संघटना केजीबीच्या दप्तरी दाखल झाले. या टिपणाच्या लेखकाची, एकोणीस वर्षीय ’व्लादिमिर ब्युकोव्स्की’ याची कसून चौकशी करुन त्याला विद्यापीठातून निलंबित करण्यात आले.बाह्यशिक्षण घेत असताना प्रसिद्ध रशियन गणितज्ञ अलेक्सांद्र येस्निन-वोल्पिनशी त्याचा परिचय झाला. त्यांच्या विचारांचा त्याच्यावर मोठा प्रभाव पडला. रक्तरंजित क्रांती वगैरे आकर्षक कल्पनांचे भूत त्याच्या शिरावरुन उतरले आणि कायदेशीर चौकटीतच व्यवस्थेला आव्हान देण्याचा मार्ग त्याने स्वीकारला. १९६३ साली युगोस्लाव्ह विचारवंत मिलोवान जिलास याचे कम्युनिझमची परखड चिकित्सा करणारे प्रसिद्ध पुस्तक ’द न्यू क्लास’ची प्रत बाळगल्याबद्दल व्लादिमिरला अटक करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या वैद्यकीय चाचणीमध्ये त्याला ’बुद्धिभ्रंशा’चा रुग्ण ठरवून त्याची रवानगी मानसोपचार केंद्रात करण्यात आली. आरोपी मनोरुग्ण असल्याने त्याला बचावाचा अधिकार नाकारत त्याच्या अनुपस्थितीत खटला चालवून त्याला दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

स्टालिनच्या काळात राजकीय कार्यकर्त्यांवर झालेल्या अत्याचारांमुळे सोव्हिएत युनियनची बरीच बदनामी झाली होती. त्यामुळे ब्रेझनेव्ह यांच्या काळात अप्रत्यक्ष मार्ग अनुसरण्यास सुरुवात झाली. राजकीय कैद्यांवरील आरोपांसाठी न्यायालयीन प्रक्रिया चालवणे वेळा व्यवस्थेला अडचणीचे ठरे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये त्यांची भूमिका मांडण्याची संधी त्यांना मिळत असल्याने, ही भूमिका सर्वसामान्यांपर्यंत सहज पोचत असे. यामुळे त्यांना मानसिक दृष्ट्या अक्षम ठरवण्याचा मार्ग सोव्हिएत व्यवस्था अवलंबत होती. कारण असा रुग्ण पुरेसा सक्षम होईतो न्यायालयीन प्रक्रिया चालू करण्यात अर्थ नाही असे तिथली न्यायव्यवस्था मानत असे. त्याचा फायदा घेऊन असे राजकीय कैदी हवा तितका काळ डांबून ठेवले जात. सोव्हिएत मानसोपचारतज्ञ आंद्रे स्नेझ्नेवस्की याने यासाठी एक काटेकोर व्यवस्थाच निर्माण केली होती.

या व्यवस्थेमध्ये अनेक राजकीय कैद्यांना बुद्धिभ्रंशाचे, अति-नकारात्मक विचाराचे, सामाजिक जीवनास अक्षम
ठरवले जाई. हे रुग्ण असल्याने तुरुंगाऐवजी ’विशेष मानसोपचार केंद्रां’मध्ये ठेवले जाऊ लागले. आता हे कैदी नसल्याने त्यांना त्यासंदर्भात व्यवस्थेने दिलेले अधिकारही संपुष्टात येत असत. मनोरुग्ण असल्याने सर्वसामान्यांसाठी धोकादायक आहेत असे जाहीर करुन त्यांना कुणालाही भेटण्याची मनाई होती. मानसोपचार केंद्राचे संचालक, आरोग्याधिकारी हे केजीबीच्या मुठीत असल्याने या रुग्णांची संपूर्ण मुस्कटदाबी करणॆ व्यवस्थेला शक्य होत असे. त्यांना खरोखरीच्या मनोरुग्णांसोबत- विशेषत: त्यातील हिंसक रुग्णांसोबत, ठेवले जात असते. यातून त्यांचे मनोबल खच्ची करुन त्यांचा बुद्धिभेद करण्याचा किंवा त्यांना खरोखरच मानसिकदृष्ट्या अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जाई. व्लादिमिरला या व्यवस्थेचा पहिला अनुभव त्याच्या या दोन वर्षांच्या शिक्षेदरम्यानच आला आणि त्याने तिला चव्हाट्यावर आणण्याचे ठरवले.

या व्यवस्थेला विरोध करण्याबरोबरच तिच्याशी सामना करण्याचे उपाय शोधणेही आवश्यक असल्याचे व्लादिमिरच्या ध्यानात आले. मानसिक छळाचा सामना मानसिक बळानेच करता येईल हे त्याने ओळखले. त्यादृष्टीने त्याने आणि सिम्योन ग्लझमन या ’रुग्णा’ने मिळून राजकीय कैद्यांसाठी मानसिक आरोग्याचे धडे देणारी माहिती-पुस्तिकाच तयार केली. त्यातील तंत्रांच्या आधारे त्याने पुढील तुरुंगवासांच्या काळात या मानसिक हल्ल्यांना समर्थपणे तोंड दिले. काही वर्षांनी या पुस्तिकेवर आधारित ’To Build A Castle' या शीर्षकाचे एक पुस्तकच त्याने प्रसिद्ध केले.

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली आंद्रे सिन्यावस्की आणि युली डॅनियल या लेखकांना झालेल्या अटकेच्या विरोधात मास्कोच्या पुश्किन चौकात निदर्शने आयोजित करण्यात आली. या दरम्यान वोल्पिन यांनी लिहिलेले ’सामाजिक आवाहन’ प्रसिद्ध करण्यात आले. यात सरकारला सोव्हिएत कायद्याला अनुसरुन न्यायव्यवस्थेमार्फत आणि माध्यमांच्या नजरेसमोर या लेखकांवरील खटला चालवण्याची मागणी करण्यात आली. ५ डिसेंबर १९६७ रोजी झालेली ही निदर्शने ’न्यायिक सुधारणांच्या’ दिशेने टाकलेले पहिले पाऊल ठरले. याला ’ग्लासनोस्त’ मेळावा म्हणून ओळखले जाऊ लागले. ही निदर्शने बेकायदेशीर असल्याचे जाहीर करुन त्याला अटक करण्यात आली.

तुरुंगात असतानाच जमा केलेल्या माहितीच्या आधारे केलेल्या सुमारे १५० पानांचे एक संकलन त्याने गुप्तपणॆ देशाबाहेर पाठवले. त्यासोबत पाश्चात्त्य मानसोपचारतज्ञांच्या नावे एक पत्रही जोडले होते. त्यात या कागदपत्रांमध्ये असलेल्या सहा सहा राजकीय कैद्यांच्या केसेसबाबत त्यांचे मत जाहीर करण्याची विनंती केली होती. सुमारे चाळीस तज्ज्ञांच्या समितीने याची पडताळणी करुन त्यातील तिघे मानसिकदृष्ट्या संपूर्ण सक्षम असून उरलेल्या तिघांनाही तात्कालिक तणावांपलिकडे गंभीर आजार नसल्याचा निर्वाळा दिला. याच सुमारास ब्रिटिश पत्रकार विल्यम कोल याने व्लादिमिर याची या विषयावर एक मुलाखत घेतली. पुढे ती अमेरिकेमधील CBS चॅनेलवरुन प्रसारित करण्यात आली. ही कागदपत्रे आणि निष्कर्ष फ्रेंच मानवाधिकार समितीतर्फे जाहीर करण्यात आले. व्लादिमिरचे पत्रही लंडनचे प्रसिद्ध वृत्तपत्र ’द टाईम्स’ आणि ब्रिटिश मानसोपचार तज्ञांच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले. या सार्‍याचा सुगावा लागताच २९ मार्च १९७१ रोजी व्लादिमिरला तिसर्‍यांना अटक करण्यात आली.

या अटकेनंतर सर्व सोव्हिएत माध्यमांनी व्लादिमिरविरोधात कांगावा सुरु केला. ’प्रावदा’ या सरकारी वृत्तपत्राने तो गुंड प्रवृत्तीचा, कारस्थानी आणि सोव्हिएत-द्रोही असल्याचे जाहीर केले. पण अन्य राजकीय कैद्यांप्रमाणॆ सैबेरिया अथवा तत्सम छळछावण्यांमध्ये सहजपणॆ ’विरुन’ जावा इतका व्लादिमिर सामान्य कैदी नव्हता. पाश्चात्त्य माध्यमे आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांनी व्लादिमिरच्या सुटकेची मागणी लावून धरली होती. सुमारे पाच वर्षे सोव्हिएत सरकारने त्याला दाद दिली नाही. अखेर १९७६ मध्ये चिलीच्या कम्युनिस्ट पक्षाचा नेता लुईस कोर्वालेन याच्या सुटकेच्या बदल्यात व्लादिमिरची सुटका करण्यास सोव्हिएत सरकारने मान्यता दिली.

त्यानंतर ब्रिटनमध्ये स्थायिक झालेल्या व्लादिमिरने मानवाधिकारासाठीचा आपला लढा चालूच ठेवला होता. केवळ कम्युनिस्ट रशियाच नव्हे तर पाश्चात्यांच्या धोरणांबद्दलही तो आवाज उठवत राहिला. युरपियन युनियनच्या संकल्पनेमधील शोषणाच्या शक्यतांवरही त्याने विस्ताराने लिहिले आहे. ’सोव्हिएत रशियाच्या पतनाने प्रश्न सुटत नाही, ती व्यवस्थाच बदलण्याची गरज आहे. अन्यथा केजीबीच्या आशीर्वादाने एकाधिकारशाहीच सत्तारुढ होईल’ अशी भीती त्याने १९९४ साली व्यक्त केली होती’. व्लादिमिर पुतीन या केजीबीच्या माजी अधिकार्‍यानेच ती वास्तवात उतरवलेली आपण पाहिली.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ६ सप्टेंबर २०२०)

रविवार, ९ ऑगस्ट, २०२०

लेखांक ११: ग्रीनहाऊस माफियांचा कर्दनकाळ: गाय पीअर्स

 मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये भडकलेल्या वणव्याने प्रचंड वनसंपत्ती, लक्षावधी वन्यजीवांचा संहार केला. मानवी संपत्तीलाही उध्वस्त करत हा वणवा तब्बल तीन महिने धुमसत होता. त्याहीपूर्वी अमेझॉनच्या जंगलात दहा महिने थैमान घातलेल्या वणव्याने नऊ हजार स्क्वेअर कि.मी. चे क्षेत्र जाळून भस्म केले होते. ब्राझीलच्या अध्यक्षाने हा वणवा आटोक्यात आणण्यात हेळसांड तर केलीच, पण अन्य देशांची मदत नाकारुन एक प्रकारे हा वणवा पसरण्यास मदतही केली. याची झळ बोलिव्हिया, पेरु, पॅराग्वे या देशांतही पसरली. त्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा प्रतिसाद अधिक नेमका होता... याचे कारण त्यांनी अनुभवलेला हा पहिलाच वणवा नव्हता. 

एकोणीसाव्या शतकापासून अशा व्यापक वणव्यांचा सामना त्यांना करावा लागलेला आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यांची वारंवारता वेगाने वाढली. १९७५ मधील वणव्यांनी जवळजवळ १५% वनसंपत्ती स्वाहा केली. १९८३, २००९ मध्ये या वणव्यांनी प्रत्येकी जवळजवळ दोन हजार घरे उध्वस्त केली नि सव्वाशेहून अधिक बळी घेतले होते. अधिक तपमान आणि कमी आर्द्रता असलेले पर्यावरण वणव्यांना अनुकूल ठरते. विसाव्या शतकात ऑस्ट्रेलियाचे सरासरी तपमान एक डिग्रीने वाढले आहे. तपमानवाढीचा वेग शतकाच्या उत्तरार्धात दुप्पट झालेला आहे. पावसाचे प्रमाण १०-२०% घटले आणि दुष्काळांची तीव्रता वाढली आहे. एका बाजूने थोड्या काळात अतिवृष्टी, पण एकुण प्रमाण घटत अवर्षण, अशी स्थिती दिसून येऊ लागली. 

त्यातून जागतिक तपमान वाढ, त्याचे कारण असलेला ’हरितगृह स्थिती’ (Greenhouse effect) यांना गंभीरपणे घेणारा आणि त्यासाठी ठोस उपाय करणारा ऑस्ट्रेलिया हा पहिलाच देश ठरला. १९९८ साली ’ऑस्ट्रेलियन ग्रीनहाऊस ऑफिस’ स्थापन करुन त्या मार्फत मुख्यत: ग्रीनहाऊस इफेक्ट आणि एकुणच पर्यावरण रक्षणाबाबत ठोस धोरण आणि धोरणात्मक चौकट तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले. गाय पीअर्स या पर्यावरण-तज्ज्ञाची या कार्यालयाचा प्रमुख सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली.

पीअर्स हा अमेरिकेतील प्रथितयश हार्वर्ड विद्यापीठातून राजकीय धोरण विषयातून पदवीधर होता. त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन उपाध्यक्ष आणि पर्यावतरणतज्ज्ञ अल् गोर यांच्यासोबत त्याने काही काळ काम केले होते. पुढे त्याने मायदेशी परतून आपले काम पुढे सुरु ठेवले होते. आपल्या पीएच.डी. साठी त्याने ’(तत्कालीन) हॉवर्ड सरकारच्या पर्यावरणविषयक धोरणांवर कार्बन लॉबीचा परिणाम.’ असा विषय निवडला. 

बहुतेक देशांत उद्योगांच्या हितासाठी काम करणारे व्यावसायिक ’प्रचारक’ (लॉबिस्ट) सरकारदरबारी कार्यरत असतात.  अनेक भल्याबुर्‍या मार्गांचा वापर करुन सरकारी धोरणे आपल्या मालक मंडळींना सोयीची करुन घेण्याचा तेप्रयत्न करत असतात. ग्रीनहाऊस इफेक्टचा मुख्य गुन्हेगार असलेला कर्बवायू (कार्बन डाय ऑक्साईड) मोठ्या प्रमाणावर उत्सर्जित करणारे उद्योगांसाठी कार्यरत असणार्‍या या मंडळींना ’कार्बन लॉबी’ असे संबोधले जाते. या दरम्यान स्वत: पीअर्सनेही काही उद्योगांसाठी हे काम केले. 

स्वानुभव आणि आपल्या पीएच.डी.च्या अभ्यासादरम्यान त्याने अशा अनेक प्रचारक मंडळींच्या मुलाखती घेतल्या. त्यातून मिळालेली माहिती आणि स्वानुभव या आधारे त्याने आपला अभ्यास पुरा केला. यातून त्याला दिसलेले चित्र धक्कादायक होते. कार्बन उत्सर्जितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी धोरणे आखली जात होती. पण ती ज्यांच्यावर बंधने घालण्यासाठी लिहिली जात होती त्याच उद्योगांचे त्यावर संपूर्ण नियंत्रण होते. त्यातील काही जणांनी तर धोरण मसुद्यातील काही भाग आपणच लिहिले असल्याचे फुशारकीने पीअर्सला सांगितले. पर्यावरण नियंत्रणाचे नियम पर्यावरण-शत्रूंच्याच हाती होते. यातीलच एकाने स्वत: आणि त्याच्यासारख्या इतरांना ’ग्रीनहाऊस माफिया’ असे संबोधले होते. त्यातील कोडगेपणा, निर्ढावलेपण पीअर्सला बोचू लागले. आणि त्याने हे उघड करण्याचा निर्णय घेतला.

२००६ मध्ये एबीसी चॅनेलवरील ’फोर कॉर्नर्स’ या साप्ताहिक कार्यक्रमासाठी जेनिन कोहन हिने त्याच्या पीएच.डी.च्या अभ्यासविषयावर पीअर्सची मुलाखत घेतली. यात मुलाखती दरम्यान पीअर्सने सरकारच्या ग्रीनहाऊस संबंधी धोरणांवर कोळसा, वाहने, तेल आणि अ‍ॅल्युमिनिअम उत्पादकांच संयुक्त लॉबी नियंत्रण ठेवते हे त्याने विशद केले. नव्वदीच्या दशकात जगात सर्वाधिक कार्बन प्रदूषण करणारा देश असलेल्या ऑस्ट्रेलियामध्ये त्यावर नियंत्रण आणण्याचे सारे प्रयत्न हे उद्योजक, त्यांचे प्रचारक कशाप्रकारे हाणून पाडत होते याचा लेखाजोखा त्याने उघड केला. हे सारे ’ऑस्ट्रेलियन इंडस्ट्री ग्रीनहाऊस नेटवर्क’ या जाळ्यामार्फत अतिशय सूत्रबद्धपणे हे उद्योग करतात हे त्याने निदर्शनास आणून दिले.

हा एपिसोड प्रदर्शित झाल्यावर राजकीय आणि उद्योग क्षेत्रात भूकंप झाला. उद्योगांनी अर्थातच हे अतिरंजित असल्याचा कांगावा केला. परंतु त्यांच्या दुर्दैवाने ऑस्ट्रेलिया इन्स्टिट्यूट या धोरणविषयक अभ्यासकेंद्राचा डिरेक्टर असलेल्या क्लाईव हॅमिल्टन याने पीअर्सच्या माहितीला दुजोराच दिला असे नव्हे तर त्यात स्वत: भरही घातली. यातून ह्यू मॉर्गन, रॉन नॅप यांच्यासारखे उद्योगपती, अ‍ॅलन ऑस्क्ली यांच्यासारखे सनदी अधिकारी, बॅरी जोन्स यांच्यासारखे तेल-उत्पादक आणि काही राजकारण्यांसह खुद्द अध्यक्ष जॉन हॉवर्ड यांची नावे घेतली जाऊ लागली. हे बारा लोक पुढे ’डर्टी डझन’ म्हणून कुख्यात झाले. 

या मुद्द्यांबाब्त पुढे त्याने ’हाय अ‍ॅंड ड्राय’ या पुस्तकात अधिक विस्ताराने लिहिले. ज्याच्या उपशीर्षक ’सेलिंग ऑस्ट्रेलियाज् फ्युचर’ असे देण्यात आले होते. या मुलाखतीनंतर आणि पुस्तकानंतर पीअर्स सरकारच्या आणि उद्योगांच्या दृष्टीने खलनायक ठरला आणि त्या क्षेत्रातून त्याची हकालपट्टी झाली. ’रेडिओ अ‍ॅडलेड’ने घेतलेल्या मुलाखतीत त्याने सुरुवातीलाच आपल्या कार्यक्षेत्राला श्रद्धांजली अर्पण केली आहे.

यानंतर त्याने पर्यावरण-धोरणविषयक अभ्यासाला वाहून घेतले आहे. पहिल्या पुस्तकानंतर त्याने ’क्वारी व्हिजन: कोल क्लायमेट चेंज अ‍ॅंड द एन्ड ऑफ रिसोर्सेस बूम’ या शीर्षकाचा एक दीर्घलेख प्रकाशित केला. यानंतर तिथे कोळसा उत्पादनांअर अनेक बंधने आली. (भारतातून तिथे गेलेल्या अदानींना उग्र निदर्शनांनंतर तेथील कोळसा उत्पादनाचा आपला प्लॅन गुंडाळावा लागला.) त्यानंतर त्याने "ग्रीनवॉश" (व्हाईटवॉशशी साधर्म्य सांगणारे शीर्षक), बिग कोल आणि ’द ग्रीनवॉश इफेक्ट’ या पुस्तकांमार्फत उद्योजकांच्या पर्यावरणशत्रू धोरणांचे वाभाडे काढणे सुरुच ठेवले आहे.

अतिवृष्टी आणि दुष्काळ हातात घालून येताना भारतानेही गेल्या चार-पाच वर्षांत अनुभवले आहे. तरी अजूनही पर्यावरणद्रोही विकासाच्या पट्ट्या डोळ्यावर बांधून बसलेले राजकारणी आणि त्यांचे भाट अजूनही त्याबाबत फारसे गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत. तूर्त देवळे, पुतळे आणि ऐतिहासिक स्थळे या ’सुफला १५-१५-१५’ प्रकारच्या संमिश्र खतावर जनमताचे पीक जोमाने वाढते आहे. ’ऑस्ट्रेलियाच्या भविष्याची विक्री’ म्हणणार्‍या पीअर्ससारखा कुणी या देशात दिसत नाही. असला तरी स्वार्थी आणि गरजू अशा दोन टोकांच्या समुदायांच्या युतीपुढे तो कितपत टिकावर धरेल याची शंकाच आहे. 

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ९ ऑगस्ट २०२०)


रविवार, ५ जुलै, २०२०

लेखांक १०: पर्यावरणाचा पहारेकरी: विल्यम सॅंजुअर

१९७४ सालच्या मे महिन्यात इलिनॉय राज्यात तीन गायी अचानक मृतावस्थेत आढळून आल्या. पोस्टमॉर्टेममध्ये त्यांचा मृत्यू सायनाइडच्या विषबाधेने झाल्याचे स्पष्ट झाले. सायनाइड हे नैसर्गिक वातावरणात आढळून येणारे रसायन नव्हे. तपासाअंती असे दिसून आले की तेथील जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सायनाइड, कॅडमिअम, शिसे, निकेल, जस्त वगैरे घातक द्र्व्ये मुरलेली आहेत. यांचा उगम होता जवळच असलेल्या ’बायरन सॅल्वेज यार्ड’मध्ये.

’बायरन सॅल्वेज यार्ड’ ही कचरा-डेपो (landfill) म्हणजे जमिनीवर कचरा जिरवण्याची जागा होती. बहुतेक उत्पादनप्रक्रियांदरम्यान निसर्गाला नि मानवालाही घातक अशी टाकाऊ द्रव्ये वा कचरा तयार होतो. अशा अनेक उद्योगांची उत्सर्जिते जिरवण्याची सेवा ही कंपनी पुरवीत होती. त्यांच्या ग्राहकांमध्ये तेलशुद्धिकरण कंपन्या, रंगनिर्मात्या कंपन्या, धातूच्या वस्तू बनवणारे कारखाने होते. या उत्पादकांचा कचरा योग्य त्या प्रक्रियेशिवाय जमिनीत गाडला जात होता. त्यातून अनेक घातक द्रव्ये आसपासच्या जमिनीत झिरपली होती.


या विल्हेवाटीचे काही निसर्गसंरक्षक नियम शासनातर्फे बनवलेले असतात. या नियमांची आखणी आणि अंमलबजावणी करण्यासाठी अमेरिकेत Environmental Protection Agency (EPA) ही संस्था काम करते. इलिनॉयमधील घटनेचा तपास करण्याचे काम विल्यम सॅंजुअर या तिच्या अधिकार्‍याकडे होते. औद्योगिक कचरा विल्हेवाट करणार्‍या अशा सुमारे ६०० कचरा-डेपोंबाबत धोक्याचे इशारे देणारे अहवाल सॅंजुअरच्या पुढाकाराने पुढच्या दोन-तीन वर्षांत तयार झाले. या अहवालांकडे खुद्द EPAने जरी दुर्लक्ष केले असले, तरी यातून निर्माण होणार्‍या भयानक परिस्थितीची जाणीव झालेल्या अनेक शास्त्रज्ञ, पर्यावरण-तज्ज्ञ आणि सॅंजुअरसारखे EPAचे अधिकारी यांनी शासनावर दबाव वाढवला. यातून १९७५ साली शासनाने ’Resource Conservation and Recovery Act (RCRA)’ कायदा पास केला. सॅंजुअरच्या कार्यकाळातले हे पहिले महत्वाचे यश होते.

सॅंजुअर काम करत असलेली EPA ही शासकीय संस्था आहे. तिचा उद्देशच पर्यावरणाच्या संरक्षणाचा आहे, जो साहजिकच औद्योगिक उत्पादकांच्या हिताच्या विरोधात जातो. कारण पर्यावरणविषयक बंधने उत्पादकांच्या दृष्टीने अनुत्पादक खर्चाला भाग पाडत असतात. हे उद्योजकच राजकारण्यांचे घोषित/अघोषित आर्थिक पाठीराखे असल्याने, त्यांच्या सोयीचे नियम आणि कायदे संसदेत आणि EPA सारख्या नियंत्रक संस्थांमध्ये केले जातील यासाठी ते ही उद्योगांना साहाय्य करत असतात. उद्योजकांच्या सोयीचे नियम, पळवाटा आणि संशोधन या संस्था, आणि उद्योजकांचे भाडोत्री संशोधक तयार करुन देताना दिसतात.

१९७८ मध्ये अमेरिकेत महागाईचा भडका उडाला आणि देश आर्थिक मंदीच्या वाटे चालू लागला होता. याला आळा घालण्यासाठी उद्योगांना चालना देणे आवश्यक ठरले. उद्योगांनी अर्थातच पहिली मागणी केली पर्यावरणविषयक निर्बंध शिथिल करण्याची. अध्यक्ष जिमी कार्टर यांच्या आशीर्वादाने  EPAचे असिस्टंट अ‍ॅडमिनिस्ट्रेटर टॉम योर्लिंग यांनी घातक कचरा विल्हेवाटीबद्दलचे निर्बंध शिथिल करण्याचे आदेश दिले. या सल्ल्याला न जुमानता आव्हान देण्याचे सॅंजुअरने ठरवले. याबाबत अमेरिकन सेनेटने नेमलेल्या चौकशी समितीसमोर १९७९ मध्ये त्याची साक्ष झाली. त्यात त्याने टॉम यॉर्लिंगने RCRA कायद्यातील तरतुदी दुबळ्या करण्याबाबत दिलेल्या सूचनांबाबत सेनेटला माहिती दिली. यात पेट्रोलियम आणि ऊर्जा कंपन्यांच्या सदोष कचरा व्यवस्थापनाबाबत कारवाई न करण्याचा निर्णयही समाविष्ट होता.

तब्बल पाच वर्ष उशीराने १९८२मध्ये EPAने एक तोळामासा प्रकृती असलेला ’घनकचरा नियंत्रण अधिनियम’ प्रसिद्ध केला. उद्योगस्नेही, अतिउत्साही माध्यमांनी ताबडतोब त्याची भलामण सुरु केली. परंतु त्यासंदर्भातील सॅंजुअरच्या अमेरिकेन सेनेटसमोरील साक्षीने या प्रचारातील हवा काढून घेतली. सॅंजुअरच्या साक्षीदरम्यान त्याने सुचवलेल्या अनेक सुधारणा अंतर्भूत केलेला ’घातक घनकचरा अधिनियम’ पुढे दोन वर्षांनी अमेरिकन संसदेने पास केला.

यापुढेही घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी मिळालेल्या पैसा घेऊन उद्योगांनी त्यांच्या केवळ जागा बदलणे, अशा कचर्‍यामुळे नजीकच्या गावा-शहरांमधील दूषित पाण्याच्या प्रश्न, सांडपाण्याचा खत म्हणून वापर करण्यातले धोके, RCRAच्या अंमलबजावणीबाबत केलेली टाळाटाळ, पर्यावरणीय निर्बंध शिथिल करण्याचे वा त्यात सूट देण्याचे राज्य पातळीवर प्रयत्न, अशा अनेक समस्यांबाबत सॅंजुअर आवाज उठवत राहिला. पर्यावरणविषयक मुद्द्यांबाबत जागृती करण्यासाठी विविध व्यासपीठांवरुन प्रयत्न केले.

असा चळवळ्या कर्मचारी EPAला ’नाकापेक्षा मोती जड’ वाटू लागला नसता तरच नवल. त्यातून त्याच्यावर बंधने घालण्याचा प्रयत्न सुरु झाला. संस्थेशी संबंधित विषयांबाबत बाहेरील व्यासपीठांवरुन बोलण्यास त्याला बंदी घालण्यात आली. या बंधनांमुळे अमेरिकन घटनेच्या पहिल्या परिशिष्टाच्या अंतर्गत देऊ केलेल्या अभिव्यक्ती-स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होत असल्याचा दावा त्याने दाखल केला. ’सॅंजुअर विरुद्ध EPA’ हा अमेरिकेच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा खटला मानला जातो. हा खटला सॅंजुअर याने जिंकला. या विजयाने कर्मचार्‍याला आपल्या मालक संस्था/उद्योगांतील गैरप्रकारांविरोधात आवाज उठवण्याचा हक्क अधोरेखित झाला. गैरकृत्ये, चुका या गुप्ततेच्या नियमांवर बोट ठेवून झाकता येणार नाहीत हे स्पष्ट झाले. पुढे अशाच स्वरुपाच्या अनेक खटल्यांमधे या खटल्याचा संदर्भ वारंवार घेतला गेला.

२००१ मध्ये सॅंजुअर निवृत्त झाला आणि EPA तसंच उद्योगांतील पर्यावरण-घातक प्रकारांविरोधात आवाज उठवण्याचे नि त्यांच्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जनजागृती करण्याचे काम करण्यास तो मोकळा झाला. आपल्या अनुभवांवर आणि संघर्षांवर आधारित ’Why EPA Is Like It Is and What Can be Done About It' हा दीर्घ मेमो आणि ’From The Files Of A Whistleblower: Or how EPA was captured by the industry it regulated.’ हे पुस्तक लिहिले आहे.

अमेरिकेसारख्या विकसित देशांपेक्षाही विकसनशील देशांत पर्यावरणाच्या र्‍हासाचा वेग अधिक असतो. कारण तिथे त्या विकासाची गरजही अधिक असते. आपल्या देशात अलिकडच्या काही वर्षांत उद्योगांच्या सोयीसाठी अभयारण्यातील उद्योगांवरील बंधने, समुद्रालगत खारफुटीच्या जंगलांवरील निर्बंध शिथिल करणे वगैरे पर्यावरण-घातक निर्णय विकासाच्या नावाखाली घेतले गेले आहेत. सध्या अवजड उद्योग मंत्रालय आणि पर्यावरण मंत्रालय एकाच व्यक्तीकडे आहे; ते कशासाठी हे वेगळे सांगायची गरज नाही!

पर्यावरणाचे होणारे नुकसान आणि त्याचे होणारे घातक परिणाम यांचे परिणाम काही पिढ्या पुढे दिसणार असतात. त्या पिढ्यांचे आणि निसर्गाचे वकीलपत्र घेऊन आज कुणी उभे राहू शकत नाही. सॅंजुअरसारखा एखादा राहिलाच, तर त्या विकासाचे लाभधारक असलेले सामान्य लोकही त्याला ’विकास-विरोधक’ म्हणून झटकून टाकत असतात.

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दैनिक दिव्य मराठी, ५ जुलै २०२०)

रविवार, १४ जून, २०२०

लेखांक ०९: मोर्देशाय वानुनू: एक चिरंतन संघर्ष

७ जून १९८१, इराक अण्वस्त्रांसाठी उपयुक्त इंधन तयार करत असल्याचा आरोप करत त्या देशातील ओसिरॅक अणुभट्टीवर इस्रायलने बॉम्बवर्षाव केला. आजवर इस्रायलने आंतरराष्ट्रीय समुदायासमोर आपल्या अणुकार्यक्रमाबाबत कायम ’नरो वा कुंजरो वा’ भूमिका ठेवली होती. उघड झालाच, तर तो स्वसंरक्षणार्थ आहे अशी मखलाशी यातून करणे शक्य होते. त्यांच्याच एका तंत्रज्ञाने लवकरच तो उघड केलाही. त्याचे नाव मोर्देशाय वानुनू.

 एका कर्मठ ज्यू घरात जन्मलेला मोर्देशाय दहा वर्षांचा असताना आपल्या भलामोठ्या कुटुंबासह इस्रायलमध्ये स्थलांतरित झाला. लष्करी अभियांत्रिकी सेवेत तीन वर्षांच्या सक्तीच्या लष्करी सेवेनंतर सैन्यात भरती होण्याचा प्रस्ताव नाकारुन त्याने पुढील शिक्षणासाठी तेल अविव विद्यापीठात प्रवेश घेतला. शिक्षण संपल्यावर त्याने इस्रायलच्या ’निगेव अणुसंशोधन केंद्रा’त कामास सुरुवात केली. इथे वानुनूची आर्थिक प्राप्ती सरासरी इस्रायली नोकरदाराच्या कित्येक पट अधिक होती. एक सुस्थिर नि सधन आयुष्याची सुरुवात होत होती.

रोजगार चालू असतानच १९७९ मध्ये त्याने एंजिनियरिंगच्या औपचारिक शिक्षणासाठी निगेवच्या बेन गुरियान विद्यापीठात प्रवेश घेतला. पुढे त्याने अर्थशास्त्र आणि ग्रीक तत्वज्ञानाकडे आपला मोर्चा वळवला. यासोबतच त्याने भटकंती करत युरप पालथा घातला. या सार्‍यांतून त्याची राजकीयदृष्ट्या अधिक व्यापक होत गेली.

आफ्रिकेतील मोरोक्कोमध्ये जन्मलेल्या मोर्देशायचे बालपणही तिथेच गेले होते. इस्रायलमधील बहुतेक राजकीय आर्थिक सत्ता ही युरपमधून आलेल्या ’अश्केनाझी’ ज्यूंच्या हाती होती. लॅटिन वंशाचे’ ’सेफर्डिक’ आणि मोर्देशायसारखे मध्यपूर्व आशिया आणि उ. आफ्रिकेतून आलेले ’मिझ्राई’ ज्यू यांना दुय्यम भूमिकेत राहावे लागे. या विषमतेबद्दल अस्वस्थ होऊन त्याबद्दल तो उघड बोलू लागला. ताबडतोब ’डाव्या विचारांचा आणि अरब-धार्जिणा’ असल्याची नोंद त्याच्या गुप्त फाईलमध्ये झाली.

लहान-सहान बाबतीत त्याला समज देण्यात येऊ लागली. त्याच्या प्रत्येक प्रवासानंतर, कुण्या अरब मित्राशी वा अपरिचिताशी झालेल्या भेटीनंतर चौकशीच्या फेर्‍या सुरु झाल्या. त्यातून या अन्यायकारक व्यवस्थेबद्दल त्याच्या मनात अधिकच अढी निर्माण झाली. कट्टर धर्मश्रद्ध घरातील कडवा उजव्या विचारसरणीचा मोर्देशाय विचाराने डाव्या बाजूला झुकत गेला. त्याच्यातील बंडखोर जागा होऊ लागला. इस्रायलच्या छुप्या अणुकार्यक्रमाची लक्तरे जागतिक वेशीवर टांगण्याचे त्याने निश्चित केले.

१९८६ मध्ये तो ऑस्ट्रेलियामध्ये असताना त्याची गाठ एका कोलंबियन पत्रकाराशी पडली. त्याच्यामार्फत प्रसिद्ध ब्रिटिश वृत्तपत्र ’संडे टाईम्स’च्या पीटर हुनाम याच्याशी संपर्क साधला. पण काही फसव्या प्रकरणात यापूर्वी हात पोळले असल्याने त्यांनी आस्ते कदम जाण्याचे धोरण स्वीकारले. मोर्देशायने दिलेल्या माहितीमधील अणुविज्ञानासंबंधीच्या तथ्यांसंबंधी स्वतंत्रपणे तज्ज्ञांकरवी खात्री करुन मगच ही सारी माहिती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला.

निगेवच्या केंद्रात सुरु असलेल्या प्रक्रियेबाबत मोर्देशायने माहिती संडे टाईम्सला दिली. यात अण्वस्त्रांना लागणार्‍या ट्रिटियम या इंधनाच्या निर्मितीसाठी आवश्यक असणार्‍या लिथियम-६ च्या निर्मितीप्रक्रियेचा समावेश होता. यातून इस्रायल वर्षाला तब्बल ३० किलो प्लुटोनियम तयार करत असल्याचे उघड झाले. आतापर्यंत त्या देशाने तब्बल १५० अण्वस्त्रे तयार करता येतील इतके इंधन जमा केल्याचे सिद्ध झाले. ओसिरॅकवर हल्ला करताना इराक अण्वस्त्रसज्ज होईल असा कांगावा या ’चोराच्या उलट्या बोंबा’ असण्याची शक्यता बळावली.

दरम्यान अधीर होऊन कोलंबियाच्या त्या पत्रकाराने स्वतंत्रपणॆ काही माहिती ’संडे मिरर’ या वृत्तपत्राला विकली. या संडे मिररचा मालक होता रॉबर्ट मॅक्सवेल, आणि हा इस्रायलच्या ’मोसाद’ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक असल्याची वदंता होती. यानेच इस्रायलला वानुनूबद्दल सावध केले असे मानले जाते.

’मोसाद’ ही संघटना आंतरराष्ट्रीय कटकारस्थाने, अपहरणे, हत्या यांसाठी कुप्रसिद्ध आहे. त्यांनी आपले जाळे मार्देशायभोवती पसरायला सुरुवात केली. अखेर निर्वासिताच्या, एकलकोंड्या जिण्याला कंटाळलेल्या त्याला ’गुलाबी कोड्या’त अडकवण्यात त्यांना यश आले. रोममध्ये सुटीवर आलेल्या मोर्देशायचे अपहरण करुन एका व्यापारी जहाजातून इस्रायलला नेण्यात आले.

सर्व तांत्रिक बाबींची खात्री करुन झाल्यावर अखेर ५ ऑक्टोबर १९८६ रोजी ’संडे टाईम्स’ने इस्रायलच्या छुप्या अणुकार्यक्रमाबद्दलची माहिती जगजाहीर केली... आणि दोनच दिवसांनी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी मोर्देशायला मोसादने इस्रायलच्या भूमीवर यशस्वीरित्या पोचते केले.

पुढल्या प्रदीर्घ संघर्षादरम्यान मोर्देशायने अनेक लहान लहान संघर्ष उभे केले. तुमची व्यवस्था कितीही बलवान असली तरी मी मोडणार नाही हे तो पुन्हा-पुन्हा सिद्ध करत राहिला. सर्वप्रथम त्याने त्याच्या तुरुंगातील सोयींच्या अभावाविरोधात तब्बल ३३ दिवसांचे उपोषण केले. पुढच्या प्रत्येक टप्प्यावर व्यवस्थेने केलेल्या लहान लहान अडवणुकींविरोधात त्याने न थकता प्रतिकाराचे अस्त्र उपसले. यात भेटीगाठींच्या अटींविरोधात केलेल्या लहान-सहान संघर्षांपासून, व्यवस्थेच्या सार्वभौमत्वाला थेट आव्हान देत ’आपले इस्रायली नागरिकत्व रद्द करावे’ या मागणीपर्यंत त्याचा लढा अथक चालू आहे.

ऑगस्ट १९८७ मध्ये त्याच्यावर देशद्रोह, हेरगिरी, गुप्ततेच्या कराराचे उल्लंघन आणि देशाच्या हिताला बाधा उत्पन्न करणारे वर्तन केल्याबद्दल खटला दाखल करण्यात आला. जो अर्थातच व्यवस्थेला अनुकूल अशा गुप्त पद्धतीने चालवला गेला. मार्च ८८ मध्ये त्याला निकाल लागून त्याला अठरा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या शिक्षेदरम्यान त्याला बेकायदेशीररित्या एकांतवासाची शिक्षा देण्यात आली. तब्बल अकरा वर्षे तो एकांतवासात होता. त्याचे मानसिक खच्चीकरण करण्याचा हा प्रयत्न होता. पण मोर्देशाय त्याला पुरून उरला आणि २००४ मध्ये तुरुंगवासातून बाहेर आला.

पण या सुटकेचा अर्थ तो स्वतंत्र झाला आहे असा मात्र नव्हे. या सुटकेनंतरही त्याच्यावर असंख्य बंधने आहेत. त्याने त्या बंधनांचे उल्लंघन करावे आणि त्याबद्दल सरकारने पकडून त्याला शिक्षा करावी असा उंदरा-मांजराचा खेळ आजतागायत पंधरा वर्षांहून अधिक काळ चालू आहे. ना तो झुकतो आहे ना सरकार. जगाच्या नाकावर टिच्चून आपले राज्य वाढवत नेत असलेल्या एका दमनकारी व्यवस्थेच्या छाताडावर न मोडता तो उभा आहे.

१९८७ सालापासून जवळजवळ दरवर्षी त्याच्या नावाची नोबेल शांतता पुरस्कारासाठी शिफारस होते आहे. पण २००९ मध्ये मोर्देशायने नोबेल पुरस्कार समितीला एक पत्र लिहून ’इस्रायलच्या अणुकार्यक्रमाचा जनक आणि माझा अपहरणकर्ता शिमॉन पेरेझ याचे नाव असलेल्या यादीमध्ये माझे नाव पाहण्याची मला इच्छा नाही. तेव्हा माझे नाव कृपया वगळावे.’ अशी विनंती केली. पुढे तो म्हणतो, ’मी जोवर स्वतंत्र नाही तोवर मी हे नामांकन वा असे पुरस्कार स्वीकारु शकत नाही. माझे स्वातंत्र्य हाच माझ्या दृष्टीने जगातील सर्वोच्च पुरस्कार असेल.’

-oOo-

(पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी १४ जून २०२०)

सोमवार, २५ मे, २०२०

लेखांक ०८: वर्णभेदभेदी कॅथी हॅरिस

बराच काळ मानेवर खडा ठेवून रोजगाराचे काम केल्यानंतर तुम्ही छानशा सुटीचा बेत आखता. परदेशातील एखाद्या छानशा ठिकाणी जाऊन सुटीचा निवांत आस्वाद घेऊन ताजेतवाने होत परतीच्या वाटेवर विमानतळावरुन बाहेर पडण्यासाठी रांगेत उभे राहता. केव्हा एकदा बाहेर पडतो नि घर गाठतो असे तुम्हाला झालेले असते. पण...

तुम्हाला तपासणीसाठी दीर्घकाळ अडकवून ठेवले जाते. कधी शरीराची बाह्य चाचपणी, कधी संपूर्ण विवस्त्र करुन तपासणी, कधी इंद्रियतपासणीदेखील! कधी तशा विवस्त्र स्थितीत तपासणी-खोलीत बसवून ठेवले जाते. काही वेळा शरीराअंतर्गत तपासणीसाठी एक्स-रे किंवा एन्डोस्कोपीतून जावे लागते. क्वचित सुलभ शौचाचे औषध देऊन कस्टम कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली उत्सर्जितांची पाहणी केली जाते. कधी हातकड्या घालून अन्य तपासण्यांसाठी हॉस्पिटलमध्ये नेऊन चार-चार दिवस डांबून ठेवले जाते...

"तुम्ही जर आफ्रिकन-अमेरिकन, त्यातही स्त्री असाल तर तुम्हाला या चरकातून जाण्याचा अनुभव मिळण्याची शक्यता अनेकपट अधिक असते." अमेरिकेच्या कस्टम्स सर्व्हिसमधील माजी अधिकारी कॅथी हॅरिस सांगत असते.

कॅथी म्हणते, ’हा सारा प्रकार मी दीर्घकाळ पाहात होते. अस्वस्थ होत होते. अनेकदा यातील काही स्त्रिया असाहाय्य नजरेने माझ्याकडे पाहात. जणू त्या मला विचारत, ’तू ही एक आफ्रिकन-अमेरिकन आहेस, स्त्री आहेस, आणि इथली कर्मचारी. तू यावर काहीच करु शकत नाहीस का?’ कॅथीची ही अस्वस्थता हळहळू वाढत गेली आणि तिने याविरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला.

पण ज्यांची चाकरी करत आहोत त्यांच्याच विरोधात उभे राहण्याच्या संभाव्य परिणामांचा अंदाज तिला होता. त्यामुळे घाई न करता, एक वर्ष आधीपासून त्याची तयारी केली. त्यावेळी ती जॉर्जियामधील अ‍ॅटलांटा शहरात हार्टफील्ड-जॅक्सन आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत होती. आपल्या दाव्यांना सिद्ध करण्यासाठी आवश्यक असलेला सुमारे सहा महिन्यांचा तिथला डेटा तिने संकलित केला. त्याला फ्लोरिडातील मायामी आणि टेक्ससमधील ’एल पासो’ येथील पूर्वीच्या अनुभवांची जोड दिली. मग तिने एका अ‍ॅटर्नीमार्फत तिने फॉक्स-५ या स्थानिक चॅनेलशी संपर्क साधला.

तिच्या कार्याचा शोध घेत असता असे लक्षात आले की एरवी अगदी एफबीआय, सीआयए यांसारख्या अतिमहत्वाच्या संस्थांविरोधात आवाज उठवणार्‍यांनाही आवर्जून स्थान देणार्‍या ’स्वतंत्र बाण्याच्या’ अमेरिकन माध्यमांनी कॅथीला मात्र ते स्थान नाकारले आहे. तिची माहिती विविध विद्यापीठांत विद्यार्थी संघटनांनी आयोजित केलेल्या संवादातून आणि ब्लॉग-टॉक सारख्या इंटरनेट माध्यमांतूनच मिळवावी लागते. कॅथी ज्या वंशभेदाबद्दल आवाज उठवते आहे, त्याचा हा आणखी एक दाहक प्रत्यय म्हणावा का?

पण एक रोचक बाब अशी की जॉर्जिया हे वंशभेदासाठी कुप्रसिद्ध असलेले दक्षिणेतील राज्य, आणि फॉक्स ग्रुप हा सनातनी उजव्या विचारांच्या प्रभावाखाली असलेला. असे असूनही कॅथीच्या या क्रूसेडमध्ये त्यांनी तिला साथ दिली हे विशेष. कॅथीने पुरवलेल्या माहितीच्या आधारे, मार्च १९९९ मध्ये फॉक्स-५ ने कस्टम्स अधिकार्‍यांकडून केल्या जाणार्‍या या वांशिक-लैंगिक भेदभावाबद्दल सहा आठवडे सीरिज चालवली. तिने केवळ जॉर्जियातच नव्हे तर पुर्‍या अमेरिकेत खळबळ माजली.

ही सारी माहिती जरी मध्यस्थामार्फत चॅनेलपर्यंत पोचत असली, तरी ती पुरवणारी व्यक्ती कोण हे ओळखणे अ‍ॅटलांटातील कस्टम्स अधिकार्‍यांना कठीण गेले नाही. मग विविध प्रकारे तिला त्रास देण्यास सुरुवात झाली. किरकोळ कारणावरुन तिला समज देणे, कामात कुचराई केल्याबद्दलची हाकाटी सुरु झाली. बहुतेक सहकारी तिच्यापासून चार हात दूर राहू लागले. अखेर ’अतिरिक्त ताणामुळे कामात कुचराई’ केल्याचा ठपका ठेवून तिला पंधरा महिने सक्तीच्या, बिनपगारी ’आरोग्य रजे’वर पाठवण्यात आले. या दरम्यान तिची शिल्लक संपली, घराचे हप्ते थकले आणि तिला ते गमावावे लागले. पुढे तिने न्यायव्यस्थेकडे दाद मागितली आणि तिला पुन्हा कामावर रुजू करुन घेण्याचे आदेश देण्यात आले.

वैय्यक्तिक पातळीवर तिला हा संघर्ष करावा लागत असताना, व्यवस्थेच्या पातळीवर मात्र काही सकारात्मक पडसाद उमटत होते. Government Accountability Office (GAO) ने मार्च २००० मध्ये  "Better Targeting of Airline Passengers for Personal Searches Could Produce Better Results" या लांबलचक नावाखाली नवी सुधारित नियमावली प्रसारित केली.

केवळ राज्य पातळीवर नव्हे तर केंद्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली. संविधानाच्या मूलभूत अधिकारांना पायदळी तुडवणार्‍या कस्टम्ससारख्या संस्थांना चाप बसवण्यासाठी “Civil Rights for International Traveler’s Act” आणि “Reasonable Search Standards Act” हे दोन कायदे पास करण्यात आले. यात कस्टम्समार्फत केल्या जाणार्‍या वैय्यक्तिक तपासणीसाठी कडक नियमावली जाहीर करण्यात आली. यात वरच्या श्रेणीतील अधिकार्‍यांना याबाबत अधिक अधिकार आणि जबाबदारी देण्यात आली. एखाद्या व्यक्तीची तपासणी दोन तासांहून अधिक काळ चालत असेल तर त्या व्यक्तीने सुचवलेल्या एखाद्या व्यक्तीला संपर्क करुन ती प्रवासी व्यक्ती कस्टम्सच्या तपासणीसाठी थांबली आहे हे कळवणे सक्तीचे करण्यात आले. सर्वात महत्वाचे म्हणजे अशा तपासणीच्या अहवालामध्ये त्या व्यक्तीचा ’वंश’ लिहिणे सक्तीचे करण्यात आले. आपल्याला दिलेल्या अन्यायकारण वागणुकीबद्दल तक्रार करणे प्रवाशांना सुलभ व्हावे म्हणून सर्व अधिकार्‍यांना आपल्या नावाचा बिल्ला वापरणे बंधनकारक करण्यात आले.

२००५ मध्ये कस्टमसेवेतून निवृत्त झालेली कॅथी आता बहुआयामी लेखिका, वक्ता म्हणून काम करते. आपल्यासारख्या जागरुक नागरिकांसाठी प्रशिक्षण, व्याख्यान, कार्यशाळा व्याख्याने ती आयोजित करत असते. २००२ मध्ये ’अमेरिकन व्हिसब्लोअर टूर’ मार्फत तिच्यासारख्याच जागल्यांसोबत तिने देशभर जनजागृती करणारी व्याख्याने दिली आहेत.

मार्च २००३ मध्ये अमेरिकेच्या Department of Homeland Security ने तिच्या कस्टम विभागासह सुमारे २२ विभागांचे एकत्रीकरण केले. या नव्या विभागाला आता अधिक कडक गुप्ततेच्या नियमांखाली काम करावे लागते आहे. आणि गुप्ततेची गरज जितकी अधिक तितकी गैरप्रकारांची शक्यताही. बाह्य निरीक्षकांच्या अनुपस्थितीत हे लोक आपल्या जुन्या अन्यायकारक प्रथांकडे पुन्हा वळणारच आहेत.

त्यामुळे सध्या ती अशा ’नागरिक दक्षता समिती’ सारख्या कल्पना मांडून त्याबाबत जनजागृती करते आहे.  बाह्य तज्ज्ञांमार्फत कस्ट्म्स वा तत्सम विभागांतील कर्मचार्‍यांना प्रशिक्षण सक्तीचे करावे असे तिचे मत आहे. यात समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञांचा सहभाग अनिवार्य केला जावा असे तिचे म्हणणे आहे. 

जगातील कोणताही देश अथवा समाज असो, त्या समाजातील शोषणाचा सर्वात मोठा हिस्सा स्त्रीच्या वाट्याला येत असतो. त्यातही तिच्या कातडीचा रंग काळा असेल, तर ती जगातील सर्वाधिक शोषित वर्गाची प्रतिनिधी असते. कॅथीसारखीचा लढा त्या वर्गाच्या पायातील साखळदंडातील एखादी कडीच उकलत असतो.

-oOo-

पूर्वप्रसिद्धी: दिव्य मराठी - रसिक पुरवणी २४ मे २०२०